आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते.
अनेक मंडळं दुर्गा देवीच्या आगमनासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रुपाचे, अर्थात देवी शैलपुत्रीची आज पूजा केली जाते.
आज सकाळपासूनच देवीच्या मंदिरांबाहेर भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेक भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर गर्दी केली आहे.
अनेक मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असणार आहे.